काकडीचे पराठे
नमस्कार मैत्रिनिनो आज आपण या लेखामध्ये काकडीचे पराठे कसे करायचे ते बघणार आहोत. काकडी खाणे आरोग्याच्या दृष्टीने खूप फायदेशीर असते. काकडी मध्ये अनेक पोषक घटक असतात तसेच काकडी मध्ये फायबर चे प्रमाण मुबलक असते. काकडी खाण्याचे बरेचसे फायदे आपल्याला माहित आहेतच परंतु, बरेच वेळा लहान मुले-मुली काकडी खाण्याचा कंटाळा करतात, त्यांचा आहारात याचा समावेश व्हावा यासाठी आपण मुलांसाठी काकडीचे पराठे बनवू शकतो. लहान मुले असे पराठे आवडीने खातात. तेंव्हा आज आपण आपण रुचकर काकडीचे पराठे सहज सोप्या पद्धतीने कसे बनवायचे ते पाहूयात. आपण हे पराठे लहान मुलांच्या टिफिनमध्ये किंवा मग नाश्त्याला बनवू शकतो.
साहित्य -
- २ मध्यम आकाराच्या काकड्या
- २ वाटी गव्हाचे पीठ
- २-३ हिरव्या मिरच्या
- ४-५ लहसून पाकळ्या
- १ मोठा कांदा
- १ चमचा जिरे
- १ चमचा ओवा
- १ चमचा तीळ
- १ चमचा बडीशेप
- १ चमचा लाल तिखट
- अर्धा चमचा हळद
- मीठ चवीनुसार
- कोथिंबीर
- पराठे भाजण्यासाठी तेल / तूप
कृती -
सर्वप्रथम एका ताटात काकडी स्वच्छ धुवून खिसून घ्यावी व कांदाही किसून घ्यावा हिरवी मिरची, लहसून व जिरे याचे मिक्सरमधून जाडसर वाटण करून घ्यावेत .
त्यांनतर एका परातीत २ वाट्या गव्हाचे पीठ घेऊन त्यामध्ये खिसलेली काकडी, खिसलेला कांदा हिरव्या मिरच्या व लहसून चे वाटण, बडीशेप ,ओवा , तीळ, हळद , तिखट ,चवीनुसार मीठ कोथिंबीर हे सर्व पदार्थ घालून ते पदार्थ एकत्रित करून गोळा तयार करून घ्यावा हा गोळा १० मिनिटे
असाच बाजूला झाकून ठेवावा. ( खिसून घेतलेल्या काकडीला पाणी सुटते त्यामुळे आपल्याला इथे पाणी घालायची आवश्यकता नसते, वरून पाणी घातल्यास आपले भिजवलेले पीठ पातळ होऊ शकते त्यामुळे शक्यतोवर पाणी घालणे टाळावे.)
गोळा थोडा मुरला कि पराठे बनवायला गॅसवर तवा गरम करायला ठेवावा व १ लहान गोळा घेऊन पोळी सारखा पराठा लाटून घ्यावा. तवा गरम होताच थोड तेल टाकून पराठा छान दोन्ही बाजूने खुरपूस भाजून घ्यावा , असे एक एक करून सर्व पराठे छान भाजून घ्यावेत. एक लक्षात असू द्या की काकडीचे व पालकाचे पराठे रुचकर भाजण्यासाठी किंचित अधिक तेल लागतं. हे गरमागरम पराठे दही किंवा सॉस सोबत खायला घ्यावे. तर अशा प्रकारे आपल्याला खुसखुशीत व पोष्टिक काकडीचे पराठे करता येतात तुम्हीही करून बघा.
धन्यवाद !
Wow...
ReplyDeleteSuper 😙