बेसन लाडू
नमस्कार मैत्रीनिंनो आज आपण या लेखामध्ये बेसन लाडू कसे बनवायचे ते जाणून घेणार आहोत. बेसन लाडू हा एक भारतीय लोकप्रिय गोड पदार्थ. बऱ्याच लोकांना गोड पदार्थ खायला खूप आवडतात, याची चव अप्रतिम लागते. आपल्याकडे कोणताही सन असो वा घरघुती कार्यक्रम किंवा मग मंदिरातल्या प्रसादासाठी आपण नेहमीच आपल्या घरी लाडू बनवीत असतो. दिवाळीच्या सणाला व रक्षा बंधनाला खासकरून बेसन लाडू घरोघरी मोठ्या प्रमाणात बनविल्या जातात. बेसन लाडू बनविण्याची प्रत्येकाची पद्धत हि वेगवेगळी आहे. बेसन लाडू बनविणे खूप सोपे आहे. आज आपण आपल्या रेसिपी मध्ये मऊ व जिभेवर लगेच विरघळतील असे बेसन लाडू कसे बनवायचे याची सोपी व उत्तम रेसिपी बघणार आहोत. दोन वेगवेगळ्या पद्धतीने आपण बेसन लाडू बनवू शकतो.
पहिली पद्धत : भाजलेल्या बेसनाचे लाडू
साहित्य :-
- २ वाटी बेसन
- १ वाटी तूप
- दीड वाटी पिठी साखर
- २ चमचे वेलची पूड
- १ चमचा जायफळ
- खाण्याचा पिवळा रंग
- २ चमचा पिस्ता
कृती :-
सर्वप्रथम पीठ गाळण्याच्या चाळणीतून बेसन पीठ नीट गाळून घ्यावेत.
शेगडीवर एका कढई मध्ये अर्धीवाटी तूप घेऊन त्यामध्ये बेसन पीठ घालावे. हे पीठ मंद आचेवर चमच्याने सतत ढवळत राहावे, जेणे करून ते करपणार नाही. मंद आचेवर बेसन छान भाजल्या जाते. (बेसन लाडूला छान रंग येण्याकरिता तुम्ही खाण्याचा पिवळा रंग एक चमचा पाण्यासोबत मिसळून टाकता येतो.) मोठ्या आचेवर बेसनपीठ भाजल्यास ते कच्चे राहू शकते व त्या पीठाचे बेसन लाडू टाळूला चीटकु शकते. बेसनपीठ ८ ते १० मिनिटे नीट तूप सुटे पर्यंत भाजून घ्यावे. आता ते पीठ एका ताटामध्ये होण्याकरिता पसरवून घ्यावे. ते पीठ थोडं थंड झाले की, त्यामध्ये पिठी साखर घालावी व नीट मिसळून घ्यावे.
त्यानंतर त्या मिश्रणामध्ये वेलची पूड व जायफळ मिसळून, मिश्रण एकत्रित करून घ्यावे. व लहान लहान लाडू हाताच्या सहाय्याने बांधून त्यावर १ -१ पिस्ता लावता येईल. असे हे आपले आवडीचे भाजलेल्या बेसनाचे लाडू सहज घरी बनवू शकता. नक्कीच करून पहा, काही अडचण असल्यास अवश्य कळवा.
दुसरी पद्धत :- बेसन पुरीचे लाडू (दामट्यांचे लाडू)
साहित्य :-
- २ वाटी बेसन
- ४ चमचे तूप
- दीड वाटी साखर
- २ चमचे वेलची पूड
- १ चमचा जायफळ
- खाण्याचा पिवळा रंग
- अर्धी वाटी खोबरं कीस
कृती :-
सर्वप्रथम पीठ गाळण्याच्या चाळणीतून बेसन पीठ नीट गाळून घ्यावेत. यामुळे त्यामध्ये बेसनाच्या गुठळ्या होणार नाहीत. एका कोपरामध्ये हे बेसनपीठ घ्यावे, त्यामध्ये ४ चमचे गरम तुपाचे मोहन टाकावे. (बेसन लाडूला छान रंग येण्याकरिता तुम्ही खाण्याचा पिवळा रंग किंवा हळद १ चमचा एक चमचा पाण्यासोबत मिसळून टाकता येतो.) आणी घट्टसर हे पीठ भिजून व चांगले मळून घ्यावे. मळलेल्या पिठाचा गोळा १० ते १५ मिनिटे एकजीव होण्याकरिता झाकून ठेवावा. तो पर्यंत या वेळात पाक तयार करून घ्यावा. शेगडीवर एका भांड्यात साखर व सखर बुडेल एवढे पाणी टाकून १० ते १५ मिनिटे एक तारी पाक करून घ्यावा. पाक तयार झाला की त्यामध्ये वेलची पूड व जायफळ मिसळून घ्यावे.
भिजवलेल्या पीठाचे लहान लहान गोळे करून, लाटून त्याच्या जाडसर पुऱ्या बनवून घ्याव्यात. (पातळ पुऱ्या केल्यास तळताना कडक होतात) सर्व पुऱ्या लाटून झाल्यात की, त्या लालसर तेलातून तळून घ्याव्यात. जाडसर पुऱ्या तुपात तळून घेतल्यास आपले लाडू अधिक चवदार बनतील. पुऱ्या थंड झाल्या की, हाताच्या सहाय्याने त्याचे तुकडे करून घ्यावे व मिक्सर मधून फिरवून घ्यावे, चांगले रवाळ होई तोवर फिरवून घ्यावेत. जाड चाळणीने हे पीठ गाळून घ्यावे म्हणजे लाडू एकसारखे बनतात. नंतर हे मिश्रण गरम पाकामध्ये ओतून घ्यावे व नीट मिसळून घ्यावे. खोबराकिस त्यामध्ये मिसळून घ्यावे. तयार मिश्रणाचे लाडू हाताच्या सहाय्याने बांधून त्यावर १ -१ काजू लावता येईल.
असे हे बेसन पुरीचे लाडू बनविण्याची सोपी पद्धत आहे. चविष्ट बेसन पुरीचे लाडू आपण वरील कृतीप्रमाणे तयार करू शकता.
धन्यवाद !