रसगुल्ला
नमस्कार मैत्रिणींनो आज आपण या लेखामध्ये रसगुल्ला कसे बनवायचे ते पाहणार आहोत. तुम्हाला तर माहितच असेल की, रसगुल्ला ही कोलकता ची प्रसिद्ध मिठाई आहे. लहानापासून मोठ्यांपर्यंत सर्वाना रसगुल्ला फार आवडतो. बरेचजणांना असे वाटते की, रसगुल्ला बनविणे काहीशी अवघड आहे. मात्र तसे नाही. हा गोड पदार्थ लहान लहान ट्रीक वापरून घराच्या घरी, खूप कमी साहित्यामध्ये, कमी वेळात सहज बनवू शकतो. तर पाहूयात रसगुल्ला बनविण्य साठी आवश्यक साहित्य तसेच त्याची सोप्यात सोपी कृती.
साहित्य -
- १ लीटर गायचे कच्चे दूध
- १ कप साखर
- ४ वाटी पाणी/गरजेनुसार पाणी
- २ चमचे लिंबूचा रस
- २ -३ वेलची
- २ चमचे मैदा
कृती -
सर्वप्रथम गॅसवर एका भांड्यात मध्यम आचेवर दूध उकळी येण्याकरीता ठेवावे.दुधाला उकळी आली की त्यामधे लिंबाचा रस घालावा,व दूध फाटून घ्यावे व थोडा हिरवट रंग आला की गॅस बंद करून ते फाटलेले दूध खाली काढून घ्यावेत. नंतर एक सुती कापड घेऊन त्यावर पनीर काढून घ्यावे व त्याचा आंबट पणा जाण्यासाठी त्यावर १ ते २ ग्लास पाणी घालावे व पाणी झारुन घ्यावे व अर्धा तासासाठी पाणी झिरपण्यासाठी बेसिन वरील नळावर किंवा दुसऱ्या एखाद्या ठिकाणी हवेत लटकून राहील असे ठेवावे.
त्यांनतर एका भांड्यात पाणी व साखर घालून मोठ्या आचेवर कच्चा पाक होण्यासाठी ठेऊन द्यावा आपल्याला इथे एकतारी किंवा दोनतारी पाक नाही करायचा.
अर्ध्या तासानंतर लटकून ठेवलेले पनीर एका परातीत काढून घ्यावे. पनीर ४ ते ५ मिनीटे नीट एकदा मळून, त्यामधे २ चमचे मैदा घालून पुन्हा ५ मिनीटे मळून घ्यावा. पनीर मळून छान मऊसर झाले की त्याचे एकसमान गोळे करून घ्यावे लहान मध्यम मोठे आपल्याला हवे तसे पनीर गोळे आपण करू शकतो.
आता कच्चा पाक झाला त्यामधे वेलची टाकून गरम पाकमध्ये पनीर गोळे सोडावेत व मोठ्या आचेवर झाकण ठेवून चमचा न फिरवता ७ ते ८ मिनीटे शिजवून घ्यावे. ७ ते ८ मिनीटे झाले की, आता ते रसगुल्ले खाली वर करून घ्यावे व गॅसच्या कमी आचेवर परत झाकण ठेवून १५ मिनीटे शिजवून घ्यावेत. नंतर खोल भांड्यात थंड होण्यासाठी काढून घ्यावे.
५ ते ६ तासानंतर रसगुल्ले छान मुरतात व खाण्यास तयार होतात.तुम्हीही सॉफ्ट आणी स्पंजी रसगुल्ले करून पाहा व कसे झाले कळवा.
धन्यवाद !