झटपट रवा बेसन ढोकळा
नमस्कार मैत्रिणींनो आज आपण या लेखामध्ये झटपट ढोकळा कसा बनवायचा ते पाहणार आहोत. ढोकळा हा कोणत्याही पद्धतीने बनवला असला तरी, खायला मात्र सर्वानाच आवडतो. बेसन रव्याचा ढोकळा करणे खूप सोपे आहे. बरेचदा आपले ढोकळ्याचे प्रमाण चुकते, आपल्याला हवा तसा ढोकळा घरी बनत नाही. म्हणून आपण ढोकळा बाहेरून मागवितो. किंवा मग तयार ढोकळा पीठ बाजारातून आणतो व ढोकळा घरी बनवतो. परंतु बाजारातल्या सारखे ढोकळे आपण घरीही बनवू शकतो. पुढे दिलेल्या कृती प्रमाणे आपण खूपच कमी वेळा मध्ये खमंग व जाळीदार ढोकळा बनवू शकतो. तर पाहुयात रवा बेसन ढोकळा कसा बनवायचा व त्याला काय काय साहित्य लागते ते पाहुयात.
साहित्य -
- २ वाटी बेसन
- अर्धीवाटी रवा
- १ वाटी तेल
- ४-५ हिरव्या मिरच्या
- ४-५ कडीपत्ता पाने
- १ चमचा मोहरी
- ४ चमचे साखर
- १ चमचा इनो
- अर्धीवाटी दही
- चिमुटभर हळद
- कोथिंबीर
- चवीनुसार मीठ
कृती :-
सर्वप्रथम बेसन आणि रवा चाळून घ्यावा. त्यानंतर एक खोलगट भांडे घेऊन त्यामध्ये २ वाटी रवा, अर्धीवाटी बेसन, अर्धीवाटी दही, चवीनुसार मीठ घालून सर्व पदार्थ एकत्रित करून घ्यावे. त्यानंतर थोडे थोडे पाणी घालून, खूप पातळ ही नाही किंवा घट्ट ही नाही, असे मिश्रण तयार करून, ५- ७ मिनिटे फेटून घ्यावे. त्यानंतर हे मिश्रण थोडा वेळ झाकून ठेवावे.
आता शेगडीवर १ कढई मध्ये पाणी गरम करायला ठेवावे. पाणी गरम होयेतोवर एका पसरट डब्याला किंवा पसरट ताटाला तेल लावून घ्यावे. नंतर १ चमचा पाणी व १ चमचा इनो एकत्रित करून, ते तयार केलेल्या मिश्रणात घालून थोडं फेटून घ्यावे. लगेच तो डबा कढई मध्ये वाफवन्या करिता १५ मिनिटे ठेऊन द्यावा.
१५ मिनिटे झाल्यानंतर ढोकळा चांगला वाफवल्या गेला आहे किंवा नाही हे पाहण्यासाठी ढोकळामध्ये चाकू टाकून पहावा. जर का चाकुला मिश्रण चिकटलेले नसेल तर आपला ढोकळा बरोबर वाफवला गेला आहे असे समजावे. त्यानंतर ढोकळा थंड होण्याकरिता खाली काढून ठेवावा.
त्यानंतर शेगडीवर १ लहान कढई मध्ये तेल गरम करायला ठेवावे त्यामध्ये १ चमचा मोहरी, कढीपत्ता, व हिरव्या मिरच्याचे तुकडे घालून १-२ मिनिटे परतून घ्यावे. त्यामध्ये १ वाटी पाणी घालून उकळी येऊ द्यावी. उकडी आल्यावर त्यामध्ये ४ चमचे साखर घालावी व खाली उतरवून घ्यावे.
त्यानंतर ढोकळा थंड झाला की त्याचे कप करून त्यावरती उकडी आलेली फोडणी नीट पसरून द्यावी.अशा प्रकारे आपल्याला खमंग व जाळीदार ढोकळा बनविता येतो.
धन्यवाद !