खव्याचे गुलाबजामुन
नमस्कार मैत्रिणींनो आज आपण या लेखामध्ये लुसलुशीत खव्याचे गुलाब जामुन कसे बनवायचे ते पाहणार आहोत. आपल्या कडे वेगवेगळ्या प्रकारे गुलाब जामून बनविल्या जातात.पण खव्याचे गुलाबजामुन म्हटलं की सर्वांच्याच तोंडाला पाणी सुटतं, आपण नेहमीच घरी गुलाब जामून बनवत असतो परंतु बऱ्याच वेळा गुलाब जामुन जसे पहिजे तसे जमत नाही, म्हणुन मी आज तुम्हाला या लेखामध्ये, खव्याचे लुसलुशीत गुलाबजामुन कसे बनवायचे व ते बनवण्यासाठी काय-काय साहित्य लागते ते पाहुयात.
साहित्य -
- २५० ग्रॅम खवा
- ४ चमचा मैदा
- २ चमचा रवा
- १ चमचा वेलची पूड
- १ मोठी वाटी साखर
- १ मोठी वाटी पाणी
- तूप किंवा तेल तळण्यासाठी
- चिमुटभर सोडा किंवा बेकिंग पावडर
कृती -
सर्वप्रथम पाक कसा करायचा ते पाहुयात -
पाक करण्यासाठी एक मोठे भांडे घ्यावे त्यामधे साखर व पाणी घालून त्यामध्ये चमचा फिरवून एकत्रित करून घ्यावे व पाक करून घ्यावा त्यामधे वेलची पूड टाकून ते भांडे गॅस वरून खाली काढून घ्यावे .
आता गुलाबजामुन कसे करायचे ते पाहुयात -
सर्वप्रथम एका परातीत खवा काढून तो खवा भाकरीच्या पिठाला मळतात तसा मळून घ्यावा. खवा जर का खूपच घट्टसर असेल तर पुरण यंत्रातून काढून घ्यावा. तुम्ही जेवढं छान खव्याला मळून घ्याल तेवढे च तुमचे गुलाब जामुन मऊसर (सॉफ्ट) येतील. त्यांनतर त्यामध्ये मैदा , रवा अर्धा चमचा वेलची पूड व अगदी चिमुटभर सोडा घालावा. सोडा जास्त प्रमाणात घालू नये, नाहीतर गुलाब जामुन तेलामध्ये फुटू शकतात. साधारणत: १० मिनीटे हा गोळा नीट मळून घ्यावा म्हणजे गुलाब जामुन तडकणार नाहीत. हा गोळा कोरडा वाटल्यास त्यामध्ये दूध शिंपडून त्याचा मऊसर गोळा करून घ्यावा व १० ते १५ मनिट हा गोळा असाच झाकून ठेवावा, त्यांनतर त्याचे लहान लहान गोळे करून घ्यावेत.
त्यांनतर गॅसवर एका कढाई ठेवून त्यामधे तेल किंवा तूप घालून हे गोळे लालसर मंद आचेवर तळून घ्यावेत. हे गोळे मंद आचेवर तळून घेतल्याने त्याचा आतमध्ये पांढरा कच्चा गोळा राहणार नाही व ते छान फुलून येतील. तेलातून तळून झाले की लगेच हे गुलाब जमून गरम पाकात टाकावे.
तर या पद्धतीने तुम्ही लुसलुशीत गुलाबजामुन बनवू शकता.
धन्यवाद !